मार्गदर्शकांचे मनोगत
सन्माननीय बंधु भगिनीनो ....!
सहकार चळवळीचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास करण्याच्या भूमिकेतून सहकार चळवळीस पोषक असे वातावरण निर्माण केले. ही सहकार चळवळ लोकशाही तत्त्वाने जपणे गरजेचे आहे . देशाच्या विकासालाआकार व दिशा देण्यासाठी सहकार क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असणाऱ्या सहकाराला संस्काराची व पावित्र्याची जोड आहे तर पवित्र किनार आहे. परंतु केवळ मूठभर लोकांनी केलेल्या अपप्रवृत्तीमुळे सहकारी अर्थकारणात राजकीय हितसंबंध निर्माण होऊन सहकाराला गालबोट लागत आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. याची संपूर्ण सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. किंबहुना स्वच्छ प्रतिमा, सहकाराची नितीमुल्ये संस्कार वा पावित्र्य यांची जाण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कार्यकुशल नेतृत्व दूरदृष्टीपणा प्रशिक्षित व प्रामाणिक कर्मचारीवर्ग असेल तरच हे शक्य आहे. कर्मचाऱ्यांच्या बरोबरच संचालक ही प्रशिक्षित असतील तरच ते आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतील. प्रशिक्षण हा केवळ खर्च नसुन मनुष्यबळात केलेली गुंतवणूक आहे हा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. सहकारी बँकिंग क्षेत्रात विविध प्रकारच्या सेवा, नव्या योजना, नवी धोरणे, चांगल्या परंपरा निर्माण करण्याची नितांत आवश्यकता आहे. बँकेने कर्ज वितरण करताना गुणवत्ता,परतफेड क्षमता पाहून लायक कर्जदारानाच कर्ज वितरण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कर्जवितरणानंतर कर्जाचा योग्य विनिमय होतो की नाही यावर नियंत्रण असेल तरच दिलेल्या कर्जाची नियमित परतफेड होऊ शकते त्यामुळे एन. पी. ए. च्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही. सध्याच्या बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. यासाठी डिजिटल बँकिंगचाअवलंब अनिवार्य आहे हे करत असताना सायबर सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. स्पर्धात्मक वातावरणात नवीन ग्राहक वाळविण्याबरोबरच ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नवीन योजनांचा विचार प्रामुख्याने करायला हवा. हे सर्व साध्य करीत असताना बँकांनी स्वतःच्या विकासाबरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव सांभाळण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.
"सर्वसामान्यांची पसंती" हे ब्रीदवाक्य असलेल्या या कोयना बँकेच्या वाटचालीमध्ये मूलभूत संकल्पनेचे प्रतिबिंब दिसून येत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. बँकेचे सभासद, खातेदार, छोटे-मोठे ठेवीदार, कर्जदार, आजी माजी संचालक, कर्मचारी वर्ग, हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागाने बँकेने यशस्वी वाटचाल केली आहे. यापुढेही बँकेच्या मूलभूत संकलपणेचे प्रतिबिंब बँकेच्या कार्यामध्ये दिसून येईल हि अपेक्षा!
बँकेच्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा!
सर्व सभासदांना, हितचिंतकांना, ग्राहकांना धन्यवाद!
स्वर्गीय. विलासराव पाटील (उंडाळकर)
(माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य)